Header Ads

{getWidget} $results={3} $label={recent} $type={list2}

२४ तासांत अनाधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस; दुर्लक्ष केल्याने डॉ. रामचंद्र जगताप यांच्यावर गुन्हा



बार्शी - बार्शी नगरपरिषदेकडून दिलेल्या बांधकाम परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून अतिरिक्त बांधकाम केल्याप्रकरणी बार्शीतील डॉ. रामचंद्र विनायक जगताप यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक नगररचनाकार वैभव विकास पायगुडे (वय २९, रा. साई पॅलासिओ, कासारवाडी रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. 


मिळालेल्या माहितीनुसार, सागर नागेश लंकेश्वर यांनी ९ मार्च २०२६ रोजी नगरपरिषदेकडे संबंधित बांधकामाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली असता मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम केल्याचे निदर्शनास आले.


तपासात तळमजला व पहिल्या मजल्यावर मंजूर आराखड्यापेक्षा अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे आढळले. तसेच संबंधित इमारतीला निवासी वापराची मंजुरी असताना त्याचा वापर व्यावसायिक स्वरूपात करून तेथे लॅब सुरू करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर कोणतीही परवानगी न घेता सुमारे १४.६५ मीटर बाय ७.६० मीटर इतके अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले.


या संदर्भात नगरपालिकेकडून यापूर्वी १३ जून २०१९ रोजीही नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर ११ मार्च २०२६ रोजी पुन्हा नोटीस बजावून २४ तासांच्या आत अनाधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र संबंधितांनी या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (६-अ) अन्वये डॉ. रामचंद्र विनायक जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


डॉ. रामचंद्र जगताप हे सध्या बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे मेडिकल सुपेरिन्टेंडंट या पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते त्याच हॉस्पिटलमध्ये सर्जन देखील आहेत. तसेच डॉ. रामचंद्र जगताप यांची स्वतःची रक्त तपासणी लॅब देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. रामचंद्र जगताप जगदाळे मामा हॉस्पिटल येथे मनमानी कारभार करीत गैरव्यवहार करत असले बाबत नागरिकांमध्ये कुजबुज आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत